Wednesday, 10 October 2007

पनीर मटर मसाला

साहित्य:
पनीर १ बाऊल
मटर १ बाऊल
कांदा १ (पेस्ट करून)
टोमॅटो २ (प्युरी करून)
क्रीम १/२ वाटी
लसूण पेस्ट १ चमचा
धने पूड पाव चमचा
जिरे पुड पाव चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
लाल तिखट पावडर पाव चमचा
लाल रंग १ टी स्पून
मीठ चवी पुरतं
तेल फोडणी पुरतं

कृती:
कढईत तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्यावी. थोडा लालसर रंग आला की त्यात लसूण पेस्ट घालावी व पुन्हा परतून घ्यावं. तेल सुटायला लागलं की त्यात टोमॅटोची प्युरी घालून एकत्र करावं. उकळी येऊन प्युरी दाट होत आली की त्यात गरम मसाला पावडर, लाल तिखट, धने - जिर्‍याची पुड घालून मिक्स करून घ्यावं. मिश्रणाला खमंग वास आला की त्यात पनीरचे तुकडे व मटर घालून मिक्स करुन झाकून एक वाफ येऊ द्यावी. शिजत आलं की त्यात चवी पुरतं मिठ घालून मिक्स करावं. सर्वात शेवटी खाण्याचा लाल रंग घालावा व पुन्हा एक वाफ येऊ द्यावी.

Friday, 24 August 2007

तिखट मिठाची पुरी

कणिक २ वाट्या
बेसन १/४ वाटी
हिंग
ओवा पुड
जिरे पुड
हळद
तिखठ
मिठ
तेल मोहन व तळण्यासाठी

कृती
कढईत तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
कणिक व बेसन एका भांड्यात घेऊन त्यात हिंग, ओवा पुड, जिरे पुड, हळद, तिखट व मिठ घालून सर्व एकत्र निट मिसळून घ्यावं. तेल कडकडीत गरम झाल्यावर फराळाच्या चमच्यानी २ - ३ चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालून सर्व पिठाला निट लागेल असं एकत्र करावं. साध्या पाण्यात ही कणिक घट्ट भिजवून घ्यावी.

पोळपाटाला तेल लावून छोट्या छोट्या पुर्‍या लाटून तळाव्या.

या पुर्‍या दह्यासोबत, लोणच्यासोबत छान लागतात. पिकनिकला नेण्यासाठी छान असतात.

स्त्रोत: आई

Friday, 22 June 2007

कुरकुरीत शेव

दाळीचं पीठ (बेसन) - ४ वाट्या
हिंग - अंदाजे पाऊण चमचा
ओव्याची पुड - १ चमचा
लाल तिखट व मीठ - चवी प्रमाणे
तेल - मोहन व तळण्यासाठी

चार वाट्या दाळीचं पीठ घेऊन त्यात हिंग तिखट व मीठ घालून कोरडंच एकत्र करावं. कढईत तेल कडकडीत तापवून साधारण पाव ते अर्धी वाटी तेल दाळीच्या पीठात घालून ओलसर करून घ्यावं. नंतर पाणी घालून हे मिश्रण साधारण सैल भिजवून घ्यावे.

शेवेच्या सोर्‍यात (शेव पात्रात) घालून शेव तेलात पाडावी. शेवेचा रंग बदलत आला की तिला झारीने तेलात दाबावे. उलटू नये. तळून झाली की रोळी मध्ये काढून घ्यावी. तेल निथळून जाऊ द्यावे.


स्त्रोत: आई

Sunday, 3 June 2007

वांग्याचं भरीत

साहित्य:
भरीताचं वांगं १
जिरे
हिंग
लसूण
अद्रक
हिरवी मिरची
तेल
कांदा
हळद
मीठ

कृती:
भरिताचं वांग तेल लाउन साल काळं होई पर्यंत भाजून घ्यावं. थंड झाल्यावर काळी साल काढून टाकावी. एका भांड्यात हे भाजलेलं वांगं, जिरे, हिंग, लसूण, अद्रक, हिरवी मिरची (सगळं चवी पुरतं) घेऊन मिक्सर मधून वाटून घ्यावं.
कांदा बारिक चिरून तेलावर वाफवून घ्यावा. चांगला शिजला की त्यात थोडी हळद घालावी व वरील वाटण घालून शिजवून घ्यावं. शिजत आलं की मीठ घालून पुन्हा एक वाफ आणावी व झाकून वाफेवर शिजू द्यावे. (गॅस बंद करून)

टिप:
काही जण यात शेंगदाणे घालतात. जर घालायचे असल्यास आधी भाजून घ्यावे. अगदी थोडे दाणे घालावेत.

स्त्रोत: आई

Thursday, 31 May 2007

केळी खोबर्‍याचा हलवा

खोबरं
केळी
साखर
दुध

खोबरं खिसून घ्या. खिस एका पातेल्यात (शक्यतो नॉन-स्टिक) घेऊन त्यात ते बुडेल इतकं दुध व साखर घालावी. पुढे केळी घालणार असल्यामूळे साखर बेतानीच घालावी. गॅसवर मंद आचेवर शिजू द्यावं. सगळं दुध आटलं की मग घट्ट होत आलं की गॅस बंद करून थंड होऊ द्यावं. थोडं कोमट झालं की केळी चुरून घालावी.

Tuesday, 1 May 2007

गाजराचा हलवा

साहित्य:
लाल गाजरं,
साखर,
दुध,
वेलची
काजू,
खिसमिस
बदाम

कृती:
लाल रंगाची गाजरं धूवुन घ्यावी. साल काढणीने त्याची वरची साल थोडी काढावी. देठं काढून टाकावी. आणि जाड खिसणीने गाजरं खिसून घ्यावी. एक किलो गाजराच्या खिसाला साधारण पाऊण वाटी तुप घेऊन त्यात गाजर शिजेपर्यंत परतून घ्यावे. खिस साधारण मऊ झाला की त्यात खिस बुडून थोडं दुध वर येईल इतकं गरम दुध घालावे. व शिजू द्यावे. मधून मधून हलवत रहावे ज्याने खिस बुडाला चिकटणार नाही व त्याला करपट वास लागणार नाही. दुध घातल्या नंतर त्याचा खवा होत आला की मग त्यात काजू, खिसमिस, बदाम व थोडी विलायची घालावी. हे सर्व मिश्रण शिजलं की त्यात एकूण मिश्रणाच्या पाऊण पट साखर घालावी व शिजू द्यावे... थंड करून द्यावे....


अवांतर : याच प्रकारे कद्दूचाही हलवा करता येतो. या हलव्याला कद्दूच्या बीया व वरील साल काढून टाकावे.

पौष्टीक धिरडी

साहित्य :
गव्हाची कणीक,
दाळीचं पीठ (बेसन),
पालक,
टोमॆटो,
कोथींबीर,
मीठ,
पाणी,
हळद,
लाल तिखट,
किंचित साखर,
तेल

कृती:

पालक व टोमॆटो धुवून वेगवेगळी पातळ पेस्ट करून ठेवावी. एक वाटी कणिकेत थोडं दाळीचं पीठ पालकची पेस्ट, मीठ, कोथींबीर चिरून, हळद थोडी साखर, लाल तिखट हे घालून सरसरीत भिजवावे. याचप्रमाणे टोमॆटोचे पीठ तयार करावे. व अर्धा तास मुरू द्यावे. तव्यावर थोडं तेल टाकून मध्यभागी टोमॆटोचे पीठ गोलाकार टाकावे. त्याभोवती पालकचे पीठ टाकावे. दोन्ही बाजूला थोडं थोडं तेल टाकून खरपूस भाजावे.

अवांतर: रोज पोळीला कंटाळा करणारी मुलं हे गंमत म्हणून आवडीने खातील. लसूण शेंगादाण्याच्या चटणीत दही घालून त्यासोबत हे खायला छान लागते.

कैरीची चटणी

साहित्य:

कच्ची कैरी (एकदम कच्ची आणि आंबट)
कांदा
जिरे
हिंग
लाल तिखट पूड
गूळ
मीठ
तेल
मेथ्या

कृती:
कैरीची साल काढून कैरीचे तुकडे करावेत. जेवढे कैरीचे तुकडे तेवढेच मापानी कांद्याचे तुकडे घ्यावेत. (म्हणजे १ वाटी कैरीचे तुकडे तर १ वाटी कांद्याचे तुकडे). कैरीचे व कांद्याचे तुकडे तिखट पुड, हिंग, जिरे, गूळ व मीठ मिक्सर मधून एकत्र करून घ्यावे. २ ३ वेळा हलवून मिक्सर मधून एकत्र करावे. एका भांड्यात काढून घ्यावे. एका टोपल्यात १ वाटी तेल ( १ वाटी कैरीचे तुकडे व १ वाटी कांदा घेतल्यास) घेऊन त्यात मेथ्या साधारण लालसर होईपर्यंत तळून घ्याव्या. व थंड झाल्यावर कैरी-कांद्याच्या मिश्रणात घालून छान एकत्र करावे.

अवांतर: मेथ्या व तेलामुळे या चटणीचा तिखटपणा बाधत नाही. कमी तेल घेतल्यास तिखटाने पित्त होऊ शकते.
पोळी व आमरसासोबत ही चट्णी मस्त लागते.

बटाट्याच्या चकल्या

लागणारं साहित्य:

१ किलो बटाटा
१ किलो भगर
१ किलो साबुदाणा
मीठ
तिखट व
जिर्‍याची पूड

कृती:
साबूदाणा आदल्या दिवशी भिजवून ठेवणे. आदल्याच दिवशी बटाटे उकडून घेणे. दुसर्‍यादिवशी भगर शिजवून घेणे. त्यात साबूदाणा व उकडलेल्या बटाट्याचा लगदा करून मिसळावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट पावडर जिर्‍याची पुड टाकून एकत्र करून घ्यावे. व चकली पात्रानी चकली करावी. चकल्या कडक उन्हात कडकडीत वाळवाव्यात. या चकल्या तळून आंब्याच्या रसासोबत छान लागतात. तसंच उपवासाला चालतात.