Sunday 22 June 2008

कारल्याचं पंचामृत

साहित्य:

कारलं १
हिरव्या मिरच्या ५-६
गुळ चवी पुरता
चिंच २ - ३ शेंगा
मेथीचे दाणे १० - १२
भाजलेल्या शेंगादाण्याचं कुट १ वाटी
हळद चवी पुरती
काळा मसाला चवी पुरता
मीठ
मोहरी
तेल

कृती:
कारल्याच्या गोल चकत्या करून मिठाच्या पाण्यात २ - ३ तास भिजवून ठेवाव्या. चिंच स्वच्छ करून पाण्यात भिजवून ठेवावी व थोड्यावेळाने कोळ काढून चिंचेचं पाणी तयार ठेवावं.
२ - ३ तासानी कारलं मिठाच्या पाण्यातून पिळून पाणी काढून टाकावं व एकदा साध्या पाण्यातून पिळून काढावे. शक्य तितकं पाणी काढून टाकून कोरं करावं.
कढईत जास्तीचं तेल गरम करून मोहरी व मेथीच्या दाण्याची फोडणी करावी. या फोडणीत हळद घालावी व कारल्याच्या फोडी तळून घ्याव्या. कारलं व्यवस्तीत तळल्या गेलं की त्यात मिरचीचे तुकडे घालून वाफवून घ्यावे.
मिरची वाफली की त्यात चिंचेचं पाणी घालावं. हे पाणी साधारण २ ते अडीच वाट्या होतं.
निट मिसळून घेऊन त्यात शेंगादाण्याचं कुट घालून हलवून घ्यावं. शेंगदाणे, कारलं आणि चिंचेचं पाणी निट एकसारखं मिसळून घ्यावं.
यात चवी पुरतं मीठ, काळा मसाला व गुळ घालून पुन्हा एकदा मिसळून घ्यावं.
पाणी जास्तीचं असल्यानं हे मिश्रण वरणा सारखं पातळ होतं. याला आटवत ठेवावं. अधून मधून हलवत रहावं.
शेंगदाण्याचं कुट मसाल्यात शिजलं की मिश्रणाला छान चव येते.

कांदा लसूण नसल्यामुळं आमच्याकडे हा पदार्थ घरी पुजा असली की नक्की होतो. पोळी सोबत खाण्यासाठी छान लागतं.