Sunday 20 January 2008

पाकातली पुरी

साहित्य:

रवा १ वाटी
मैदा १ वाटी
मीठ चिमूटभर
साखर १ वाटी
तेल मोहन व तळण्यासाठी

कृती:
रवा, मैदा व चिमूटभर मीठ एका भांड्यात एकत्र करून घ्यावं. तेल कडकडीत तापवून या मिश्रणात टाकून मिश्रण ओलसर करून घ्यावं. साध्या पाण्यात भिजवून ३ - ४ तास झाकून ठेवावं.
एका वाटीत मैदा व तूप एकत्र करून पातळ भिजवावे.
रवा मैदा मुरला की मिश्रण हाताला ओलसर लागतं. मुरल्यानंतर मिश्रणाचे पोळीच्या कणीकेसारखे गोळे करून घ्यावे व पोळी लाटावी. या पोळीच्या एका बाजूवर मैदा व तूपाचं मिश्रण पसरावं व पोळी बाजूला ठेवावी. दुसरी पोळी लाटून तिच्यावरही मैदा व तुपाचं मिश्रण एका बाजूला लावावं. दोन पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा रोल करावा. या रोलचे छोटे तुकडे करावे. हे तुकडे लाटून यांची पूरी करावी. या पुर्‍या मध्यम आचेवर तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळाव्यात. एकावर एक अशा पुर्‍या ठेवल्यानं व रोलचे तुकडे करून त्यांची पुरी केल्याने या पुर्‍यांना पदर छान सुटतात. पुर्‍या थंड होण्यासाठी एका परातीत अथवा ताटात काढाव्यात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात अथवा निर्लेपच्या भांड्यात एक वाटी साखर घेऊन तिच्यात थोडं पाणी टाकून ३ तारी पाक करून घ्यावा. त्यात हवी असल्यास थोडी विलायचीची पुड टाकावी. पुर्‍या थंड झाल्यावर या पाकात २ - ३ मिनिटं बुडवून बाहेर काढाव्या व डब्यात भरून ठेवाव्यात.
ह्या पुर्‍या १० १५ दिवस छान टिकतात.

चकली

साहित्य:

दाळीचं पीठ १ वाटी
ज्वारीचं पीठ ३ वाट्या
तेल मोहन व तळण्यासाठी
हळद चवी पुरती
तिखट चवी पुरतं
मीठ चवी पुरतं
हिंग चवी पुरता
ओवा चवी पुरता
जिरे चवी पुरते

कृती:
दाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, हळद, तिखट, मीठ, जिरे, ओवा, हिंग हे सर्व एका कोरड्या भांड्यात मिक्स करून घ्यावे. तेल कडकडीत तापवून त्याचं मोहन वरील मिश्रणात मिश्रण ओलसर होईल इतकं टाकून एकत्र करावं. साध्या पाण्यात भिजवावं. चकली पात्राला आतून तेल लावून वरील मिश्रण त्यात भरावे. कागदावर हळू हळू दाबत चकली पाडावी. गॅसच्या मध्यम आचेवर चकली तळून घ्यावी.